प्रती,
श्री. विलासराव देशमुख,
मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र
प्रेषक,
अध्यक्ष व सरचिटणीस,
टीवी जर्नलिस्ट असोसिएशन
मुंबई
दिनांक - ३१/०७/२००८
विषय- 'टीवी जर्नलिस्ट असोसिएशन'च्या विविध मागण्यांबाबत,
मा. महोदय,
'टीवी जर्नलिस्ट असोसिएशन' मुंबईतील दूरचित्रवाणी वाहिन्यांमधील पत्रकारांची एकमेव संघटना आहे. मुंबईतील किमान २० न्यूज
चॅनलमधील ३९० पत्रकार या संघटनेचे सदस्य आहेत.
आणि ही सदस्य संख्या वाढतेच आहे.
तरी, केवळ आपल्या सदस्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण न्यूज चॅनलच्या पत्रकारांच्या हितासाठी आम्ही या पत्राद्वारे आपल्यासमोर काही मागण्या ठेवू इच्छीतो.
या मागण्यांचा आपण सहानूभुतीपूर्वक विचारकरून त्याला मंजूरी द्यावी ही विनंती.
मागणीपत्राची स्वतंत्र प्रत सोबत जोडत आहे.
धन्यवाद,
आपले,
(अध्यक्ष व सरचिटणीस
'टीवी जर्नलिस्ट असोसिएशन'
मुंबई)
टीवी जर्नलिस्ट असोसिएशन चे मागणीपत्र
स्वतंत्र प्रेस रूम
मंत्रालयात 'टीवी जर्नलिस्ट'साठी स्वतंत्र प्रेस रूम असावी. सध्या मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर तशी सोय उपलब्ध करून देणे शक्य आहे. या प्रेस रूम चा उपयोग दैनंदिन वार्तांकन सोयीचे करण्याबरोबरच कैमेरा इ. सारख्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.
कार्यालय
'टीवी जर्नलिस्ट असोसिएशन' ही नोंदणीकृत संघटना असून या संघटनेला मुंबईत कार्यालयाची नितांत गरज आहे. राज्य सरकार ने या नोंदणीकृत संघटनेला नरिमन पॉईंट परिसरातल्या बरॅक मधील ५०० चौरस फूट इअतकी जागा भाडE तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात तसेच कायमस्वरूपी कार्यालयासाठी मुंबईत सवलतीच्या दरात भूखंड उपलब्ध करून द्यावा. या भूखंडासाठीचा सवलतीचा दर देण्यास संघटना तयार आहे.
अधिस्विकृती पत्र संख्या वाढवावी.
प्रत्येक न्यूज चैनलच्यासाठीचा अधिस्विकृती पत्राचा कोटा वाढवावा. सध्या दर न्यूज चॅनेलला ६ अधिस्विकृती पत्रं दिली जातात ती संख्या वाढवून १२ करावी.
वीवीआईपी पासेस
मुंबईत अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या भेटीच्या वार्तांकनासाठी दिल्या जाणा-या प्रवेशपत्र पद्धतीत सूसुत्रता आणावी. पास केवळ एस बी १ कडूनच आणि कार्यालयीन वेळेतच दिले जावेत. अनेकदा कार्यक्रमांचे यजमान हे पास मिळवून देण्याचे दावे करतात तसेच एस बी १ कडूनही एक अख्खा दिवस खर्ची घालल्याशिवाय हे पास मिळत नाहीत. या दोन्ही अडचणी नष्ट कराव्यात.
शासकीय कार्यक्रम सल्ला
सरकारी कार्यक्रमाच्या ठिकाणी (उदा. शपथविधी, पुरस्कार वितरण इ.) टीवी चैनल्सच्या पत्रकारांसाठी जागा निश्चित करताना 'टीवी जर्नलिस्ट असोसिएशन'ला विश्वासात घ्यावे. जेणेकरून, कॅमेरा आणि ओबी व्हॅन उभे करण्याबाबत सुलभता येऊ शकेल तसेच घटनास्थळी पोलिस यंत्रणेशी संघर्ष टाळता येईल.
समिती सदस्य वाढवावेत
राज्य सरकारच्या 'पत्रकार हल्ले प्रतिबंध समिती'वर वर्तमानपत्रांच्या संपादकांप्रमाणेच २ न्यूज चैनलच्या संपादकांनाही स्थान असावे. त्यांच्या नावांची शिफारस 'टीवी जर्नलिस्ट असोसिएशन' करेल.
समिती नियुक्तांबाबत
राज्य सरकारकडून विविध समित्यांवरील नियुक्त्यांसाठी पत्रकारांचा विचार केला जातो. त्यानुसार यापुढे 'टीवी जर्नलिस्ट'चाही गांभिर्याने विचार व्हावा.
साधनसामग्री मोडतोड भरपाई
पत्रकारांवरील हल्ल्यांदरम्यान त्यांच्या साधनसामग्रीची मोडतोड झाल्यास 'मुख्यमंत्री निधी'तून त्याची भरपाई करण्यास आपण तत्वत: मान्यता दिली आहे. उगग्रह वाहिन्यांची साधन सामग्री विमा संरक्षण प्राप्त असल्याने याचा लाभ मुख्यत्वे न्यूज चॅनलच्या मुंबईसह महाराष्ट्रात विखुरलेल्या मान्यताप्राप्त स्ट्रिंजर्स आणि कॉन्ट्रीब्यूटर्सना व्हावा. वार्तांकनासाठीची साधनसामग्री त्यांच्या मालकीची व अनेकदा विमा संरक्षणाविना असते.
गृहनिर्माण योजनेत अग्रक्रम
'टीवी जर्नलिस्ट असोसिएशन' चे सदस्य विविध आर्थिक गटातील आहेत. यातील अनेकांना आजही मुंबईत स्वत:चे घर नाही, आणि घरांच्या वाढत्या किंमतींमुळे ते आता आवाक्याबाहेर होते आहे. तरी संघटनेच्या गरजू आणि अर्हताप्राप्त सदस्यांसाठी 'म्हाडा'मार्फत ३०० घरे प्राधान्याने उपलब्ध करून द्यावीत. म्हाडाने आपल्या योजनेत 'टीवी जर्नलिस्ट्साठी' विशेष अग्रक्रम द्यावा. या घरांसाठी 'म्हाडा' ने निश्चित केलेला दर सदर गरजू आणि अर्हताप्राप्त व्यक्ती देईल.
अंतिम परंतू तितकेच महत्वाचे
आम्ही विनंती करतो की, 'टीवी जर्नलिस्ट असोसिएशन'च्या विविध मागण्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मा. मुख्यमंत्रांनी एक 'समन्व्यक अधिकारी' नेमावा. आम्ही जाणतो की आमच्या मागण्या विविध विभागांशी संबंधित आहेत. त्यामुळे, एखादा उच्चस्तरीय आय ए एस अधिकारीच याबाबत उत्तम समन्वयक बनू शकेल. अशा अधिका-यास मा. मुख्यमंत्र्यांनी मागण्या पूर्ततेबाबत कालमर्यादा घालून द्यावी.
धन्यवाद
सर्व सदस्य,
टीवी जर्नलिस्ट असोसिएशन
मुंबई
दिनांक - 31/07/2008
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें